chinhaki dnyaneshwar to gangadhar patil

 सुहृदगाथेचा लोप श्रीधर तिळवे नाईक 

गंगाधर पाटील गेले एक सुहृदगाथा गेली मराठीतील संरचनावाद , विरचनावाद आणि उत्तरसंरचनावादाचा पाया घालणारा समीक्षक गेला 

१९८९ साली मुंबई विद्यापीठात जेव्हा पी एच डी करायला आलो तेव्हा त्यांना मी प्रथम भेटलो त्यांच्या समीक्षेविषयी मी अतीव आदर व्यक्त केला मी कवी असूनही समकालीन तत्वज्ञानात रस घेतो हे त्यांना आवडले असावे त्यांच्या विद्ववतेचा दबदबा आहे असं मला कळलं तरी मी माझ्या बिनधास्त शैलीत त्यांना भेटत राहिलो 

माझ्या मते मराठीत कादंबरीत भालचंद्र नेमाडे व समीक्षेत गंगाधर पाटील असे दोन दिग्गज साठोत्तरी पिढीत झाले 

युरोपमध्ये जिला न्यू क्रिटीसिझ्म म्हणतात तिचा उदय झाल्यावर मराठीत तिचा प्रभाव पडणे अटळ होते दोन्ही धोंडगे व गंगाधर पाटील ह्या तीघांनी ही चळवळ व्यापक प्रमाणावर आणली व पुढे मिलिंद मालशे ,  म सु पाटील , राजीव नाईक , हरिश्चन्द्र थोरात ह्यांनी त्याचा विस्तार केला माझ्या पी एच डी साठी संरचनावाद व उत्तरसंरचनावाद मला फार महत्वाचा वाटत असल्याने मी सरांच्यावर माझ्या चिन्हकीत केंद्रीय स्थान देऊन लिखाण केले होते माझा प्रयत्न सरांच्यापुढं जाऊन काय करता येईल ते पाहणे होतं 

मराठीत कलावंतांना समीक्षक लागतात ते फक्त आरती ओवाळून घ्यायला समीक्षकांच्यामुळं आपल्या कलेत सुधार करणे त्यांना मानवत नाही साहजिकच स्तुतिपाठकांना समीक्षक म्हणणे हा कलाकारांचा एक कल आहे साहजिकच गंगाधर पाटलांना फार प्रतिसाद मिळाला नाही ते सौम्य भाषेत टीका करत आणि वाभाडे काढण्यापेक्षा उकलून दाखवण्याकडे त्यांचा कल होता माझा ह्या चळवळीवर एकच आक्षेप होता तो म्हणजे आऊटडेटेड झालेल्या लोकांच्यावर तुम्ही हे नवे क्रिटीसिझम का अप्लाय करता ?रोमान जाकोबसनने शेक्सपियरच्या सॉनेटवर लिहिलं म्हणून मराठीनं तेच तेच का करावं ? ह्यावर त्यांचे उत्तर हे योग्य आहे असेच होते . 

माझे अनुष्टुभविरुद्धचे बंड त्यांना पटले नाही म सु पाटलांच्या आग्रहाखातर मी अनुष्टुभला पुढे कविता दिल्या कारण माझे ह्या दोन पाटलांच्यावर वैचारिक प्रेम होते मला ते एकतर तू सामान्य दर्जाचा कवी आहेस किंवा आमच्या पिढीच्या आवाक्याबाहेरचा कवी आहेस असं  म्हणाले तरीही मी त्यांच्यावर लिखाण केले मी असे लेखन केले आहे म्हंटल्यावर ते पेचात पडले मी त्यांना माझ्यासाठी कोण काय करतं ह्यापेक्षा मी काय करतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे असं म्हणालो तेव्हा ते विद्वत्तापूर्ण गंभीर हसले मात्र हे लिखाण कुणीही प्रसिद्धीकरता स्वीकारले नाही 

त्यांच्या सुहृदगाथा च्या प्रस्तावनेने पु शि  रेगे जसे उलगडून दाखवले तसे कुणीही केलं नसेल प्रत्येक पिढी आपल्या आधीच्या पिढीतील लेखकांच्यावर तपशीलवार समीक्षा लिहिते गंगाधर पाटील ह्यांनी हे कर्तव्य सुहृदगाथेत रेगे ह्यांच्यावर लिहून पार पाडले आदिबंधात्मक समीक्षेचा त्यांनी केलेला वापर अप्रतिम होता 

देरिदाचा विरचनावाद असो कि संरचनावाद  वा घटितार्थशास्त्र असो ते अतिशय सोप्या भाषेत त्यांचा उलगडा करत त्यांची रेखेची वाहणी पुढे समीक्षेची नवी रूपे ह्या ग्रंथाला जन्म देती झाली  

त्यांच्या रूपाने मराठीतील समीक्षाक्षेत्रात एक नवे युग अवतरले आज हे युग गेले 

दिलीप चित्रेंच्या कवितेचा आधार घेऊन म्हणायचं तर मुख्यार्थ निघून गेला आहे ध्वन्यार्थ चिरायू राहील 


श्रीधर तिळवे नाईक 

ज्ञानेश्वरीचा विश्वनाथ काशिनाथ राजवाडेकृत अभ्यास आणि परिणाम 

विठ्ठल हा मूळचा शैव देव वैष्णव कसा झाला ? वारकरी संप्रदायाने वर्णजातिव्यवस्था घट्ट केली कि सैल केली ? ज्ञानेश्वरीची अधिक जुनी प्रत राजवाड्यांची कि मडगावकरांची ? हे प्रश्न सोडून देऊन मी इथं एका वेगळ्याच मुद्द्याची चर्चा करणार आहे हा मुद्दा म्हणजे मराठी चिन्हकीत राजवाडे ह्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेचे स्थान काय ?मराठीत ह्याचा सांगोपांग विचार तुळपुळे ह्यांनी केला 

भालचंद्र नेमाडे ह्यांच्या देशीवादाचा आरंभ सुरवातीला राजवाड्यांपासून झाला होता हे मुद्दाम नोंदवावेसे वाटते नंतर ते फुले ह्यांच्या देशीवादापाशी पोहचले आहेत 

मराठीत किंबहुना भारतात महात्मा फुले ह्यांनी शैव देशीवादाचा पाया घातला ही वस्तुस्थिती आता सर्वमान्य आहे ज्योतिबा व खंडोबा ह्या देशी देवतांना त्यांनी दिलेल्या स्थानापासून देशीवादाची सुरवात होते पेशवाईला नाकारून शिवशाहीला स्वीकारणेही त्यांनीच सुरु केले त्यांनी आर्य आणि अनार्य अशी द्विध्रुवात्मकता स्पष्टपणे भारतात स्थापित केली पुढे श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांनी भारतात 

१ उत्तर -दक्षिण 

२ शैव -वैष्णव 

३ ब्राम्हण -क्षत्रिय 

४ आर्य -द्रविड 

५ संस्कृत -प्राकृत 

६ कर्मठ -नवे 

अशा द्विध्रुवात्मकता दाखवून दिल्या 

मी त्या नीट एकत्ररित्या प्रकट व्हाव्या म्हणून 

शैव - आर्य 

ही द्विध्रुवात्मकता मांडतो आहे 

महात्मा फुल्यांच्या देशीवादाला छेद देण्यासाठी राजवाड्यांनी आर्य देशीवादाची जी मांडणी केली तिचे खरे प्रत्यंतर ह्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तवनेत येते त्यांना आपण कोकणस्थ ब्राम्हण आहोत ह्याचा कमालीचा अभिमान होता आणि देशीवादाला हे साजेसेच म्हंटले पाहिजे 

ह्या प्रस्तावनेत राजवाडे ह्यांनी जी भाषेची वर्गीकरण पद्धत शोधली ती  मला आजही विचार करण्यायोग्य वाटते राजवाड्यांच्या मते भाषेचे चार भेद होतात 

१ प्रांतकृत 

२ जातीकृत 

३ लिंगकृत 

४ कालकृत 

मराठी भाषा वर्हाडी , कोकणी , देश , खान्देशी अशी प्रांतकृत बदलत जाते प्रत्येक जातीची वेगळी मराठी भाषा असते असं स्वीकारणं जड जातं पण दलित साहित्याने हा मुद्दा ऐरणीवर आणलेला दिसतो किंबहुना ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळीत ब्राह्मणांच्या संस्कृतनिष्ठ भाषेची भटाळलेली भाषा किंवा बामणी भाषा म्हणून यथेच्छ टिंगल झालेली दिसते आणि हीच टिंगल दलित साहित्यानंतर अधिक शास्त्रीय झालेली दिसते 

ह्यातील लिंगकृत भाषा म्हणजे स्त्रियांची व पुरुषांची भाषा वेगवेगळी असते तर कालकृत म्हणजे काळाप्रमाणे भाषा बदलत जाते म्हणजे यादवकालीन मराठी , शिवाजीकलीन मराठी , पेशवाईकालीन मराठी , ब्रिटिशकालीन मराठी , आधुनिक मराठी व आत्ताची देशीकालीन व चौथी नवताकालीन वा जालकालीन मराठी 

ह्यातील यादवकाळांचा अभ्यास करतानाच साहजिकच यादव कोण हा प्रश्न उभा राहिला व पुढे  त्यांचा व राजारामशास्त्री भगवंतांचा यादव कोण ह्यावरून वाद झाला व पुढे भागवतांनी यादव हे मराठे अशी मांडणी केली राजवाडे ह्यांच्या मते मगध प्रदेशात व पुढे उत्तर भारतात  नंद राजांचा काळ हा शूद्र लोकांचा काळ ! शूद्र राजे राज्य करू लागल्याने व ते अवैदिक असल्याने . त्यांनी अवैदिक पंथांना पाठिंबा दिल्याने ब्राम्हण व क्षत्रिय  हतबल व अगतिक झाले आपल्या धर्माचं व सामाजिक संस्थांचं रक्षण व्हावे म्हणून हे ब्राम्हण व क्षत्रिय विंध्य ओलांडून  दंडकारण्यात आले व त्यांचा इथे स्वतंत्र गण निर्माण केला ज्याला पुढे महाराष्ट्रिक गण असे नाव पडले व त्या गणावरूनच महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव पडले .राजवाडे ह्यांच्या मते ह्या गणाचा इथल्या स्थानिक नाग लोकांशी संबंध आला राजवाडे नागाची उत्पत्ती नग म्हणजे डोंगर व डोंगरावर राहणारे लोक ते नाग अशी देतात ( आपण अलीकडे नग दिसतोस असं म्हणतो तेव्हा ह्या नाग लोकांचा  अधिक्षेप करत असतो ते ह्या राजवाडे ह्यांच्या उत्पत्तीमुळे ) राजवाड्यांच्या मते हे नाग लोक मागासलेले होते ( ही पुढारलेले मागासलेले ही द्विध्रुवात्मकता कोकणस्थ ब्राम्हणांची ह्या काळात फार आवडती होती असं दिसतं राजवाड्यांची तर ती इतकी आवडती होती कि त्यांच्या महान लोकांच्या यादीत १ वगळून इतर सर्व कोकणस्थ होते . ) 

भागवतांनी हे खोडून काढण्यासाठी यदुक्षेत्रात ब्राम्हणांचा प्रवेश ह्या कृतीत नाग शब्दाची उपपत्ती स्वीकारतात  पण ती थेट अयोध्यातल्या डोंगरवासियांना लावून ह्या नाग लोकांची कन्या ही रामायणातील रामपुत्र कुशाची पत्नी होती असं दाखवतात यदूचा सासराही ते नागवंशीय होता म्हणतात व  पुढे यदु वंशाची मूळ भूमी द्रविड असं ते सिद्ध करतात महाराष्ट्रातील मराठे हे यदुवंशाचे वारस आहेत असं ते दाखवतात (काही अर्धवट माहिती असलेल्या व काहीच माहिती नसलेल्या अर्धवटरावांनी महेश पवार ह्यांनी शेअर केलेल्या माझ्या पोस्टवर अर्धवट टीका केली होती मी तिला उत्तर दिलं न्हवतं कारण ए बी सी डी पासून कोण समजावत बसणार ?)

मला इथं राजवाडे भागवत वादात जायचे नाही (कारण मतभेद उदा माधव शब्दाची एक उत्पत्ती मा म्हणजे माँ पार्वती व धव म्हणजे धरतीचा मालक म्हणजे शंकर अशीही आहे )पण ह्या प्रस्तावनेतील राजवाड्यांच्या यादवकालीन व ज्ञानेश्वरकालीन मराठीमीमांसेवर त्यांच्या ह्या सिद्धांताचा खोल परिणाम झाला होता हे सांगायचंय 

राजवाडे हे पहिले विचारवंत होते ज्यांनी दादोबा पांडुरंगाचे वर्णनात्मक भाषाशास्त्र अपुरे ठरवून ऐतिहासिक भाषाशास्त्राचे उदघाटन मराठीत केले व ज्ञानेश्वरकालीन व यादवकालीन मराठीचा सांगोपांग अभ्यास ह्या प्रस्तावनेत सादर केला 

ह्या प्रस्तावनेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संस्कृतचा कालिक अभ्यास ते 

१ पूर्ववैदिक संस्कृत 

२ आर्ष संस्कृत 

३ आत्ताची 

असा दाखवतात ह्यातील पूर्व वैदिक भाषा असावी हे त्यांचे अनुमान पुढे खरे ठरलेले दिसते मात्र ती भाषा आर्य न्हवती हे आता स्पष्ट झाले आहे 

राजवाड्यांच्या मते वैदिक भाषा ही चार प्रकारे अवतरते 

१ ग्रान्थिकी २ प्रांतिक ३ जातिक ४ अपभ्रंश 

ह्यातील ग्रांथिक हा शब्दप्रयोग मला आवडतो कारण अलीकडे जो शुद्ध -अशुद्ध किंवा प्रमाण -अप्रमाण हा जो भाषिक वाद व  गोंधळ आहे तो त्यामुळे बाजूला टाकता येतो आणि वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक व चिन्हतंत्रवैज्ञानिक ग्रंथ लिहिताना ग्रांथिक भाषा वापरावी असा सुझाव आपण देऊ शकतो 

मराठीच्या व्याकरणाची चर्चा ते महानुभव पंथातील पंडित ह्यांच्या पंचवार्तिक पासून करत त्यांच्या स्वकाळापर्यंत येतात 

वारकरी चळवळ भक्तिभाववादी पण तिच्या ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाच्या राजवाडेलिखित प्रस्तावनेमुळे मराठी भाषिक ज्ञानाच्या अनेक पेट्या उलगडायला सुरवात केली हे मात्र खरे ! भक्तिदिंडीतून ज्ञानदिंडीत ह्या निमित्ताने थोडे आणावे एव्हढ्याचसाठी हा खटाटोप 

श्रीधर तिळवे नाईक 







Comments